याकोब 1:12-18
याकोब 1:12-18 MACLBSI
जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला.