यहेज्केल 7
7
अंत आला आहे
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्यांवर
शेवट आला आहे!
3आता तुमचा शेवट आला आहे,
आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन.
तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन
आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
4मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;
मी तुमची गय करणार नाही.
मी खचितच तुमच्या कृत्यांचे
आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’
5“सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही#7:5 काही मूळ प्रतींनुसार विपत्तीवर विपत्ती अशी विपत्ती
पाहा, ती येत आहे!
6अंत आला आहे!
अंत आला आहे!
तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे.
पाहा, तो येत आहे!
7तुम्ही जे देशात राहतात,
त्या तुमच्यावर विनाश आला आहे.
समय आला आहे! दिवस जवळ आहे!
डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.
8मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे
आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे.
तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन
आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
9मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;
मी तुमची गय करणार नाही.
मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे
आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन.
“ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.
10“ ‘पाहा, तो दिवस!
पाहा, तो येत आहे!
विनाशाचा भडका उठला आहे,
काठीला अंकुर फुटला आहे,
अहंकार फुलला आहे!
11हिंसा उदय पावली आहे,
दुष्टाला शिक्षा करण्यास काठी उठली आहे.
त्या लोकांतून कोणीही,
त्या समुहातील कोणीही सुटणार नाही;
त्यांच्या संपत्तीतील,
कशाचे काहीही मोल राहणार नाही.
12समय आला आहे!
दिवस येऊन ठेपला आहे!
विकत घेणार्याने आनंद करू नये
किंवा विकत देणार्याने दुःखी होऊ नये,
कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.
13जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे
तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती;
त्याची फेड होणार नाही.
कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त
पलटणार नाही.
त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती
आपला जीव वाचविणार नाही.
14“ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे,
त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे,
परंतु कोणी युद्धात जाणार नाही,
कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.
15बाहेर तलवार आहे;
व आत पीडा व दुष्काळ आहे.
जे देशात राहतात
ते तलवारीने मरतील;
जे शहरात आहेत
ते दुष्काळ व पीडांनी नाश पावतील.
16आश्रयासाठी पळ काढणारे
डोंगराकडे पळतील.
खोर्यातील पारव्यांप्रमाणे,
आपल्या स्वतःच्या पापाकरिता,
ते सर्व शोक करतील.
17प्रत्येक हात ढिले पडतील;
प्रत्येक पाय लघवीने भिजेल.
18ते गोणपाट नेसतील
आणि भयाचे वस्त्र घालतील.
प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल,
आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.
19“ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील,
आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल.
याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी
त्यांचे चांदी व सोने
त्यांची सुटका करू शकणार नाही.
ते त्यांची भूक मिटवणार नाही
किंवा त्यांचे पोट भरणार नाही,
कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.
20त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला
आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला.
त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या;
म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन.
21मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन
आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील,
व ते भ्रष्ट करतील.
22लोकांपासून मी आपले मुख वळवेन,
आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील.
ते त्यात शिरतील
आणि त्यास भ्रष्ट करतील.
23“ ‘साखळ्या तयार करा!
कारण देश रक्तपाताने,
आणि शहर हिंसेने भरले आहे.
24सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन
जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील.
बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन,
आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.
25जेव्हा आतंक येतो,
ते व्यर्थच शांतीचा शोध करतील.
26विपत्तीनंतर विपत्ती,
आणि अफवांवर अफवा येतील.
संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील,
नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील,
वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.
27राजा शोक करेल,
राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल,
आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील.
त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन,
आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन.
“ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
ที่ได้เลือกล่าสุด:
यहेज्केल 7: MRCV
เน้นข้อความ
คัดลอก
เปรียบเทียบ
แบ่งปัน
ต้องการเน้นข้อความที่บันทึกไว้ตลอดทั้งอุปกรณ์ของคุณหรือไม่? ลงทะเบียน หรือลงชื่อเข้าใช้
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.