1 करिंथकरांस 5
5
अनीतिमान बंधूला बहिष्कृत करा
1मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत. 2आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का? 3मी शरीराने अनुपस्थित असलो तरी आत्म्याने उपस्थित आहे आणि उपस्थित असल्यासारखा मी प्रभू येशूंच्या नावाने जो हे कृत्य करीत आहे त्याचा न्याय करून चुकलो आहे. 4आपल्या प्रभू येशूंच्या शक्तीने युक्त असा माझा आत्मा व तुम्ही एकत्र मिळून 5या मनुष्याला देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.
6तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का? 7या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले. 8आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.
9तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते. 10जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल. 11मी तुम्हाला लिहित आहे की आपण बंधू किंवा भगिनी आहोत असा दावा करीत असतानाही जे जारकर्म किंवा लोभी, निंदक, मूर्तिपूजक, मद्य प्राशन करणारे आहेत अशांमध्ये मिसळू नका. अशा लोकांबरोबर भोजनास देखील बसू नका.
12मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का? 13बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”#5:13 अनु 13:5; 17:7; 19:19; 21:21; 22:21, 24; 24:7
ที่ได้เลือกล่าสุด:
1 करिंथकरांस 5: MRCV
เน้นข้อความ
คัดลอก
เปรียบเทียบ
แบ่งปัน
ต้องการเน้นข้อความที่บันทึกไว้ตลอดทั้งอุปกรณ์ของคุณหรือไม่? ลงทะเบียน หรือลงชื่อเข้าใช้
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.