फिलिप्पैकरांस 4
4
स्थैर्य व ऐक्य राखण्यासंबंधी शेवटचा बोध
1यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभूमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा.
2मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभूमध्ये एकमनाचे व्हा. 3होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत.
शेवटचा बोध
4प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा. 5तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत. 6कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. 7आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
8शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा. 9माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.
त्यांच्या दानाबद्दल आभार
10मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही. 11मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे. 12मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे. 13जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
14तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. 15फिलिप्पैकरांनो, तुम्हाला हे माहीत आहे की, शुभवार्तेच्या प्रारंभीच्या दिवसात मी मासेदोनियामधून गेलो, तेव्हा देण्याघेण्यामध्ये केवळ तुमच्याशिवाय कोणत्याच मंडळीने माझ्याशी भागीदारी केली नाही. 16मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. 17मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो. 18मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत. 19त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील.
20खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
शेवटच्या शुभेच्छा
21तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा.
माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात.
22आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.
23आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
Currently Selected:
फिलिप्पैकरांस 4: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.