शास्ते 8
8
जेबह व सलमुन्ना
1आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला.
2परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय? 3परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.
4मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले. 5तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”
6परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?”
7त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.”
8मग तो तिथून पेनुएल#8:8 पेनुएल काही हस्तलेखात पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले. 9म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.”
10आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते. 11मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला. 12जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.
13योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला. 14तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली. 15मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ” 16मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला. 17त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.
18मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?”
त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”
19गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.” 20मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.
21जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.
गिदोनाचा एफोद
22आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”
23परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.” 24आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)
25त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला ते देण्यास आनंद होईल.” म्हणून त्यांनी एक वस्त्रे पसरले आणि त्यांच्यातील प्रत्येकाने आपल्या लुटीतील एकेक कुंडले तिथे टाकली. 26त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल,#8:26 अंदाजे 20 कि.ग्रॅ. याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या. 27गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले नगर ओफराह येथे ठेवले. सर्व इस्राएली लोकांनी त्याची उपासना करून व्यभिचार केला आणि ते गिदोन आणि त्याच्या कुटुंबासाठी पाश असे झाले.
गिदोनचा मृत्यू
28अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.
29योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला. 30गिदोनाला एकूण सत्तर पुत्र झाले, कारण त्याला अनेक पत्नी होत्या. 31शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते. 32योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.
33गिदोन मरण पावल्याबरोबर, इस्राएली लोकांनी बआल दैवताच्या मागे लागून पुन्हा व्यभिचार केला. त्यांनी बआल-बरीथची दैवत म्हणून स्थापना केली 34आणि ज्या याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने, त्यांच्या चहूकडील शत्रूंच्या हातातून सोडविले होते, त्यांचे स्मरण ठेवले नाही. 35तसेच इस्राएलसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही त्यांनी यरूब्बआल (म्हणजे गिदोन) च्या घराण्यावर काहीही निष्ठा दाखविली नाही.
Currently Selected:
शास्ते 8: MRCV
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.