YouVersion Logo
Search Icon

शास्ते 21

21
बिन्यामीन वंशजांसाठी स्त्रिया
1इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.”
2ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला. 3“याहवेह इस्राएलांचे परमेश्वर,” ते आक्रंदून म्हणाले, “इस्राएल सोबत असे का घडले? आज इस्राएलातील एक गोत्र का कमी झाले?”
4मग दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून, त्यांनी तिथे वेदी बांधली आणि तिच्यावर होमार्पण व शांत्यर्पणे अर्पिली.
5नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे.
6सर्व इस्राएली लोक त्यांचा बंधू बिन्यामीन गोत्राबद्दल दुःखी झाले. ते म्हणाले, “आज इस्राएलांच्या एका गोत्राचा उच्छेद झाला आहे. 7आता जे उरले आहेत त्यांच्यासाठी पत्नी मिळवून देण्यास काय करावे? कारण आपण तर याहवेहची शपथ घेऊन म्हटले आहे की विवाहात त्यांना आपण आपल्या कन्या देणार नाही.” 8नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते. 9कारण जेव्हा त्यांनी लोकांची मोजणी केली, त्यांना आढळून आले की याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही तिथे नव्हते.
10म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा. 11तुम्हाला हे करावयाचे आहे ते म्हणाले, “सर्व पुरुष आणि स्त्रिया ज्या कुमारिका नाहीत त्या सर्वांना तुम्ही मारावे.” 12त्यांना याबेश-गिलआद येथे राहणार्‍या लोकांमध्ये चारशे तरुण स्त्रिया आढळल्या ज्या कधीही पुरुषांसोबत निजल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांना कनान देशातील शिलोह येथील छावणीत आणले.
13मग संपूर्ण सभेने बिन्यामीन गोत्राकडे जे रिम्मोन खडकावर राहत होते, निरोप पाठवून त्यांच्याकडे शांतीची बोलणी केली. 14बिन्यामीन लोक त्यावेळेस परत आले आणि याबेश-गिलआद येथील उर्वरित स्त्रिया त्यांना पत्नी म्हणून देण्यात आल्या आणि मग ते आपापल्या घरी परतले. परंतु त्या त्यांना पुरेसा नव्हत्या.
15बिन्यामीन गोत्रासाठी लोकांनी दुःख केले, कारण याहवेहने इस्राएलांच्या गोत्रांमध्ये दरी निर्माण केली. 16आणि सभेतील वडिलांनी म्हटले, “बिन्यामीन स्त्रियांचा संहार केल्यामुळे जे पुरुष उरले आहेत त्यांना पत्नी कशी मिळवून द्यावी? 17उरलेल्या बिन्यामीन लोकांना वारस मिळालेच पाहिजे, म्हणजे इस्राएलच्या एका गोत्राचा नाश होणार नाही. 18आपण आपल्या कन्या त्यांना देऊ शकत नाही. कारण आपण इस्राएली लोकांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे: ‘जो कोणी बिन्यामीनास पत्नी करून देईल, तो शापित होईल.’ 19आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.”
20म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना असे बोलत सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा 21आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकी एकीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे. 22आणि जेव्हा त्यांचे वडील आणि भाऊ गार्‍हाणे घेऊन आमच्याकडे येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आमच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी, कारण युद्धात आम्हाला त्यांच्यासाठी पत्नी मिळाली नाही. तुम्ही तुमची शपथ मोडल्याबद्दल दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कन्या त्यांना दिल्या नाहीत.’ ”
23यासाठी बिन्यामीन लोकांनी हे केले. जेव्हा तरुण स्त्रिया नाचत होत्या, तेव्हा प्रत्येक पुरुषाने एकी एकीला धरले आणि तिला आपली पत्नी म्हणून घेऊन गेले. ते परत आपल्या वतनात आले आणि त्यांनी नगरे परत बांधली आणि ते त्यात राहू लागले.
24मग त्यावेळी इस्राएली लोकांनी ते स्थान सोडले आणि आपआपले गोत्र आणि कुळाप्रमाणे असलेल्या वतनात आपल्या घरी परतले.
25त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल ते करी.

Currently Selected:

शास्ते 21: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in