YouVersion Logo
Search Icon

शास्ते 15

15
पलिष्ट्यांवर शमशोनाचा सूड
1काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देत नव्हते.
2“मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.”
3शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.” 4म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली, 5मशाली पेटविल्या आणि कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात मोकळे सोडले. त्यांनी द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे आणि उभे धान्य जाळून टाकले.
6तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, लोकांनी उत्तर दिले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले आहे, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.”
तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले. 7शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.” 8तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला.
9इकडे पलिष्टी लोक वर गेले आणि त्यांनी यहूदीयात तळ ठोकला व लेहीवर हल्ला केला. 10तेव्हा यहूदीयाच्या लोकांनी विचारले, “तुम्ही आमच्यासोबत युद्ध करण्यास का आलात?”
त्यांनी उत्तर दिले, “आम्ही शमशोनाला कैदी करून घेऊन जाण्यास आलो आहोत, कारण जसे त्याने आमचे केले तसे आम्ही त्याचे करणार आहोत.”
11तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहिती नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले आहे?”
त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.”
12ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.”
शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ खा.”
13“आम्ही सहमत आहोत,” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही फक्त तुला बांधणार आणि तुला त्यांच्या हवाली करणार. आम्ही तुला मारणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधले आणि खडकाच्या कपारीतून बाहेर आणून वर घेऊन गेले. 14जेव्हा तो लेहीला पोहोचला, तेव्हा पलिष्टी लोक ओरडत पुढे आले. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर उतरला. ज्या दोरांनी त्याच्या दंडांना बांधले होते ते दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांवरून गळून पडले. 15मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि त्याने एक हजार पलिष्ट्यांस ठार केले.
16मग शमशोन म्हणाला,
“गाढवाच्या जाभाडाने
मी राशींवर राशी पाडल्या.
केवळ गाढवाच्या जाभाडाने
मी हजार माणसे वधली.”
17आपले बोलणे संपविल्यावर त्याने आपल्या हातातील ते जाभाड फेकून दिले; आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने रामाथ-लेही#15:17 रामाथ-लेही म्हणजे जाभाडाची टेकडी असे ठेवले.
18त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?” 19तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरे#15:19 एन-हक्कोरे म्हणजे हाक मारणार्‍या मनुष्याचा झरा असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो.
20पलिष्टी लोकांच्या काळात शमशोनाने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व#15:20 किंवा न्याय केला केले.

Currently Selected:

शास्ते 15: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in