शास्ते 1
1
इस्राएलचे उर्वरित कनानी सोबत युद्ध
1यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”
2याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने पुढे जावे; ही भूमी मी त्यांच्या हातात दिली आहे.”
3मग यहूदीयाच्या पुरुषांनी इस्राएली बांधव शिमओनीना म्हणाले, “कनानविरुद्ध लढण्यासाठी आमच्यासोबत मिळालेल्या वतनात वर चला. तुमच्या वतनात आम्ही तुमच्यासोबत येऊ.” तेव्हा शिमओनी त्यांच्याबरोबर गेले.
4जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला. 5बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला. 6अदोनी-बेजेक पळून गेला, परंतु त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि त्याच्या हातांचे आणि पायांचे आंगठे कापले.
7त्यानंतर अदोनी-बेजेक म्हणाला, “ज्या सत्तर राजांच्या हातापायांचे आंगठे कापून टाकले आणि ते माझ्या मेजाखालचे तुकडे उचलतात. आता परमेश्वराने मला त्याची परतफेड दिली आहे.” त्यांनी त्याला यरुशलेमला आणले आणि तिथे तो मरण पावला.
8यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली.
9त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले. 10मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला. 11तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्या लोकांवर हल्ला केला.
12कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.” 13कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली.
14एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
15तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.
16मोशेच्या सासर्याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून#1:16 म्हणजे यरीहो अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.
17नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह#1:17 म्हणजे विनाश असे म्हणतात. 18यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.
19याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्यात राहणार्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत. 20मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले. 21तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.
22योसेफाच्या गोत्रांच्या लोकांनी बेथेलवर स्वारी केली आणि याहवेह त्यांच्याबरोबर होते. 23जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले, 24एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.” 25म्हणून त्याने त्यांना दाखविले आणि त्यांनी तलवारीच्या बळावर पूर्ण शहर नष्ट केले, परंतु त्या मनुष्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचविले. 26त्यानंतर तो हिथी लोकांच्या देशात गेला, तिथे त्याने एक शहर निर्माण केले आणि त्याचे नाव लूज ठेवले, जे नाव आजपर्यंत आहे.
27परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता. 28जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही. 29तसेच एफ्राईमने गेजेर येथे राहणार्या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, परंतु कनानी लोक त्यांच्यामध्येच राहिले. 30जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले. 31आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही. 32आशेरी लोक त्या देशात राहणार्या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही. 33नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले. 34अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्यात येऊ दिले नाही. 35आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला. 36अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती.
Currently Selected:
शास्ते 1: MRCV
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.