YouVersion Logo
Search Icon

शास्ते 3

3
इस्त्राएलांची परीक्षा पाहण्यासाठी राखून ठेवलेली राष्ट्रे
1इस्राएल लोकांस कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली. 2इस्राएलाच्या नव्या पिढ्यांना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहीत नव्हते त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही; 3पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी. 4इस्राएलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते. 5अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यामध्ये राहू लागले. 6त्यांनी त्यांच्या मुली आपणास स्त्रिया करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली.
कुशल-रिशाथईमच्या हातातून अथनिएल इस्त्राएल लोकांस सोडवतो
7इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले; 8म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती विकत दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम#हारान किंवा मसोपटोमिया ह्याची सेवा केली. 9इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. 10त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले, 11त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
मवाबाच्या हातातून एहूद इस्त्राएलांना सोडवतो
12पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याला इस्राएलावर सबळ केले, कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते हे याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते. 13तेव्हा एग्लोन राजाने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्राएलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले. 14इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली. 15परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली. 16एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली 17त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे भेट सादर केली; एग्लोन हा फार लठ्ठ होता. 18भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकांस त्याने निरोप दिला; 19पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, “गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.” 20एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला. 21मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली; 22पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती. 23मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले. 24तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.” 25त्यांना मोठी काळजी वाटू लागली, आपण कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता. 26सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईर येथे जाऊन पोहचला. 27तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला. 28तो त्यांना म्हणाला, “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.” तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही. 29त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही बचावला नाही. 30अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या सत्तेखाली आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे विसावा मिळाला.
पलिष्ट्यांच्या हातातून शमगार इस्त्राएल लोकांस सोडवतो
31एहूदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची संकटातून सुटका केली.

Currently Selected:

शास्ते 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for शास्ते 3