YouVersion Logo
Search Icon

शास्ते 2

2
बोखीम येथे परमेश्वराचा दूत
1परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, “मी तुम्हाला मिसरातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही; 2तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? 3आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.” 4परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले 5त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम #आक्रोश किंवा रडणे असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले.
यहोशवाचा मृत्यू
6जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले. 7यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली. 8परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला. 9एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले. 10ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
इस्त्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल
11इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले; 12आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले. 13परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली; 14इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. 15परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत. 16मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत; 17तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही. 18परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई. 19पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत. 20तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही; 21म्हणून यहोशवाच्या मृत्यू वेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही; 22पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.” 23म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.

Currently Selected:

शास्ते 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in