YouVersion Logo
Search Icon

गीतरत्न 8

8
1तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती.
2मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते, तू मला शिकवले असतेस, मसाला घातलेला द्राक्षारस, माझ्या डाळिंबाचा रस मी तुला पिण्यास दिला असता.
3त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो; त्याचा उजवा हात मला आलिंगो.
4यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या.
प्रेम मृत्यूसारखे प्रबळ
5आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.
6आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
7असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.
8आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत; आमच्या ह्या बहिणीला मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे?
9ती तटासारखी असली तर तिच्यावर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू.
10मी तटासारखी होते, माझे कुच बुरुजासारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले.
11बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता, त्याने तो बागवानांना सोपवून दिला होता; त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजारहजार रुपये द्यायचे होते.
12माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्‍यांचे.
13अगे बागांत राहणारे, तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाल्या आहेत; मलाही ते ऐकव.
14माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy