YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 91

91
सर्वसमर्थाच्या पंखांखाली आश्रय
1जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”
3कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.
4तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.
5रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण,
6काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही.
7तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही;
8मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.
9कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस,
10म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
11कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
12तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.
13तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील.
14माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.
15तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;
16त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in