YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 89

89
देवाचा दाविदाशी करार
एज्राही एथान ह्याचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.
2कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस.
3“मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे :
4‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;”
(सेला)
5हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल.
6कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे?
7पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे.
8हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे.
9समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस.
10तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस.
11आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस.
12उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.
14नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत.
15ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
16ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.
17कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2
18आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.
19पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टान्ताने बोललास; तू म्हणालास, “मी एका वीराकडे साहाय्य करण्याचे सोपवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे.
20माझा सेवक दावीद मला मिळाला आहे; मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.
21त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील. माझा भुजही त्याला बलवान करील.
22शत्रू त्याला छळणार नाहीत; दुष्ट जन त्याला पीडा देणार नाहीत.
23मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चीत करीन. त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन.
24माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3
25मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26तो माझा धावा करून म्हणेल, ‘तू माझा पिता, माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहेस.
27मी तर त्याला ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन.
28मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील.
29त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन.
30जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत,
31जर माझे नियम त्यांनी मोडले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,
32तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्यांच्या अनीतीचे शासन फटक्यांनी करीन;
33तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही;
34मी आपला करार मोडणार नाही; माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही.
35एकवार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की, मी दाविदाला कदापि दगा देणार नाही;
36त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील;
37चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल; आकाशांतील साक्षीदार विश्वसनीय आहे.”
(सेला)
38तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास.
39तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस.
40तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत.
41सर्व येणारेजाणारे त्याला लुटतात; तो आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना निंदेचा विषय झाला आहे.
42त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहेस; तू त्याच्या सर्व वैर्‍यांना हर्षवले आहेस.
43तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहेस. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाहीस.
44तू त्याला निस्तेज केले आहेस, त्याचे राजासन तू जमीनदोस्त केले आहेस.
45त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटवले आहेस तू त्याला लज्जेने वेष्टले आहेस.
(सेला)
46हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार?
47माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय?
48असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील?
(सेला)
49हे प्रभू, ज्यांविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिलीस, ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोठे आहेत?
50हे प्रभू, तुझ्या सेवकाची निंदा होत आहे, सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवत आहे, ह्याची आठवण कर.
51हे परमेश्वरा, हे तुझे शत्रू निंदा करतात, पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करतात.
52परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy