YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 38

38
पश्‍चात्तप्त अंत:करणाची प्रार्थना
स्मरण देण्यासाठी दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस.
2तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे.
3तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही;
4कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.
5माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.
6माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो.
7माझ्या कंबरेला दाह सुटला आहे; माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही.
8माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.
9हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे; माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही.
10माझे काळीज धडधडत आहे; माझी शक्ती मला सोडून गेली आहे; माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही.
11माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात; माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात.
12माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.
13मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
14ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालो आहे.
15हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे; हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील.
16मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.”
17कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे. माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे.
18मी आपला दोष पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी खिन्न आहे.
19माझे वैरी जोमदार व बलवान आहेत; खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत.
20जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बर्‍याची फेड वाइटाने करणारे मला विरोध करतात.
21हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
22हे प्रभू, माझ्या उद्धारा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy