YouVersion Logo
Search Icon

फिलिप्पैकरांस पत्र 2

2
ऐक्याप्रीत्यर्थ विनंती
1ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत,
2तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
3तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.
4तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
5अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;
6तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
7तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
8आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
9ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले;
10ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
11आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे
12म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;
13कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.
14जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा;
15ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता;
16असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
17तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
18आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
तीमथ्य
19तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.
20तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.
21कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;
22पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.
23म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे.
24तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन.
एपफ्रदीत
25तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;
26कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता;
27तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.
28म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
29ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;
30कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy