YouVersion Logo
Search Icon

लेवीय 27

27
नवसांसंबंधी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग : एखाद्या मनुष्याने परमेश्वराला माणसाचा विशेष नवस केला तर त्या मानवाचे मोल तू येणेप्रमाणे ठरवावे : 3पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे, 4आणि स्त्री असली तर तिचे मोल तीस शेकेल असावे.
5मुलगा पाच वर्षांहून मोठा व वीस वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल वीस शेकेल व मुलीचे दहा शेकेल असावे.
6मुलगा एक महिन्याहून मोठा व पाच वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलगी असली तर तीन शेकेल रुपे असावे.
7पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे.
8पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्‍याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे.
9लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत असतात त्यांपैकी एखाद्या पशूचा नवस केला, तर परमेश्वराला अर्पायचा असा प्रत्येक पशू पवित्र समजावा.
10त्याने तो बदलू नये म्हणजे वाइटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये; त्याने एका पशूबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत.
11लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशू याजकापुढे उभा करावा,
12त्या पशूचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक म्हणून तू ठरवशील तितके त्याचे मोल समजावे.
13पण नवस करणार्‍याने तो सोडवला तर तू ठरवलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा.
14एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील तेवढे त्याचे मोल समजावे.
15घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहील तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल.
16एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिला, तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे; एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपे ठरवावे.
17योबेलवर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरवशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे.
18योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेलवर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरवलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावेत.
19शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहील, तर तू ठरवलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल.
20त्याने ते शेत सोडवले नसेल किंवा दुसर्‍या कोणाला ते विकले असेल, तर ते ह्यापुढे सोडवून घेता यायचे नाही;
21पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल.
22स्वतःच्या वतनाचे नसलेले म्हणजे खरेदी केलेले शेत कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करू पाहील,
23तर याजकाने योबेलवर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरवशील तितके परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे.
24ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे.
25ज्याचे मोल तू ठरवशील ते पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे; शेकेल म्हणजे वीस गेरा.
26ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच. त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही; तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडामेंढरांपैकी असो, तो परमेश्वराचाच आहे.
27तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
28तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील, मग तो मानवप्राणी असो, पशू असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो, ते विकू नये किंवा सोडवू नये; जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र समजावे.
29मानवप्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल, तर त्याला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
30भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत; ते परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होय.
31एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवायचा असल्यास त्यात त्याने एक पंचमांशाची भर घालून तो सोडवावा.
32गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एकेक पशू परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असावा.
33कोणी त्याचे गुणावगुण पाहू नयेत किंवा त्याला बदलू नये; कोणी त्याला बदललेच तर तो पशू व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत; मोल देऊन ते सोडवता येणार नाहीत.
34परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी सीनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.

Currently Selected:

लेवीय 27: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy