YouVersion Logo
Search Icon

लेवीय 2

2
अन्नार्पणे
1कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा.
2मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
3अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.
4भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे.
5तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
6त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय.
7कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे.
8अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे; ते याजकाकडे आणून द्यावे, व त्याने ते वेदीजवळ न्यावे.
9याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
10अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.
11परमेश्वराला अर्पण केलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर नसावे; कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पायचे नाहीत.
12प्रथमउत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
13तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस; तुझ्या सर्व अर्पणांसह मीठसुद्धा अर्पावे.
14परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण.
15त्यावर तेल ओत व धूप ठेव; हे अन्नार्पण होय.
16चोळून काढलेले दाणे व तेल ह्यांपैकी काही भाग स्मारकभाग म्हणून सर्व धूपासहित याजकाने जाळावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय.

Currently Selected:

लेवीय 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy