YouVersion Logo
Search Icon

यहोशवा 24

24
यहोशवाचा अखेरचा निरोप
1नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले.
2तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करत.
3तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला.
4मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला.
5नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले.
6मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले; मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला आणि मिसरी लोकांनी रथ व स्वार ह्यांसह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला.
7त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्‍यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात.
8मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्‍या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला.
9नंतर मवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलाशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले;
10पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले.
11तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.
12मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले;
13मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हांला दिली; जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यांत तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात.
14तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.
15परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”
16तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो;
17कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून, दास्यगृहांतून काढून आणले; त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले;
18आणि ह्या देशात राहणार्‍या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले; आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे.”
19यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही.
20तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.”
21लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.”
22यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहोत.”
23यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.”
24लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.”
25तेव्हा यहोशवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेमात त्यांना विधी व नियम लावून दिले.
26ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली.
27यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पाहा, ही शिला आपल्याविरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्याविरुद्ध साक्षीदार होईल.”
28मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले.
यहोशवा आणि एलाजार ह्यांचा मृत्यू
(शास्ते 2:6-10)
29ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.
30एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली.
31यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
32योसेफाच्या अस्थी इस्राएल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा (एक चलन) देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.
33नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला; त्याला त्यांनी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठमाती दिली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy