YouVersion Logo
Search Icon

यहोशवा 2

2
यरीहो येथे दोन हेर पाठवले जातात
1नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.
2मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
3तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्‍या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”
4त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, “माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही.
5अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले; ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल.”
6पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते.
7त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्‍या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली.
8इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली, 9आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;
10कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.
11हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
12मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या;
13तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.”
14तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”
15तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले; कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती.
16तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणार्‍यांनी तुम्हांला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा; तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील; मग तुम्ही मार्गस्थ व्हा.”
17ते पुरुष तिला म्हणाले होते, “तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हांला दोष न लागो;
18मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरवलेस, तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर.
19कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.
20जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहवली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.”
21ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.
22ते जाऊन डोंगरवटीत पोहचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणार्‍यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.
23मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले.
24ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy