ईयोब 42
42
ईयोबाची कबुली व त्याचा अंगीकार
1मग ईयोब परमेश्वराला म्हणाला,
2“तुला सर्वकाही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे.
3अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. ह्यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही.
4आता ऐक; मी बोलतो! मी तुला विचारतो, तू मला बोध कर,
5मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे;
6म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.”
7परमेश्वराचे ईयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, “तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही.
8तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील; कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन; म्हणजे मग माझा सेवक ईयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हांला मिळणार नाही.”
9हे ऐकून अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी ह्यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; आणि परमेश्वराने ईयोबावर अनुग्रह केला.
ईयोबाची समृद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते
10ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.
11मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली.
12परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.
13त्याला आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या.
14एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे नाव कसीया व तिसरीचे केरेनहप्पूक अशी त्यांची नावे त्याने ठेवली.
15ईयोबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या; त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावांप्रमाणेच वतन वाटून दिले.
16त्यानंतर ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला; आणि त्याने चार पिढ्यांपर्यंत आपले पुत्रपौत्र पाहिले.
17नंतर ईयोब वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मरण पावला.
Currently Selected:
ईयोब 42: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.