YouVersion Logo
Search Icon

शास्ते 1

1
यहूदा व शिमोन अदोनी-बेजेक राजाला पकडतात
1यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला विचारले की, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी?” 2परमेश्वर म्हणाला, “यहूदाने स्वारी करावी; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”
3यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, “माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू; तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन;” तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला.
4मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांना त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केले.
5बेजेक येथे त्यांची अदोनी-बेजेकाशी गाठ पडली तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढून कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केला;
6पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले.
7तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातापायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत; माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. यहूदा यरुशलेम व हेब्रोन हस्तगत करतो 8यहूदाच्या वंशजांनी यरुशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली.
9नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणार्‍या कनान्यांशी लढायला गेले.
10मग हेब्रोनात राहणार्‍या कनान्यांवर यहूदा चालून गेला; त्याने शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते.
अथनिएल दबीर जिंकून अखसाशी विवाह करतो
(यहो. 15:15-19)
11तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
12कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.”
13तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली.
14ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली,1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
15ती त्याला म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या.” तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले.
यहूदा आणि बन्यामीन ह्यांनी जिंकलेले प्रदेश
16मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.
17मग यहूदाने आपला भाऊ शिमोन ह्याच्याबरोबर जाऊन सफाथ येथे राहणार्‍या कनान्यांना पराभूत करून त्यांचा समूळ नाश केला; म्हणून त्या नगराचे नाव हर्मा (समूळ नाश) असे पडले.
18ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली.
19यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.
20मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन नगर कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना हाकून दिले.
21यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.
योसेफ बेथेल घेतो
22योसेफाच्या वंशजांनीही बेथेलावर स्वारी केली; परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
23बेथेल हेरण्यासाठी योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.
24त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; त्याला त्यांनी म्हटले, “नगरात शिरण्याची वाट आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुला अभय देऊ.”
25तेव्हा त्याने त्यांना नगरात शिरण्याची वाट दाखवली आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली; पण त्या मनुष्याला व त्याच्या परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
26त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर वसवले व त्याचे नाव लूज ठेवले. त्या नगराचे नाव आजपर्यंत तेच आहे.
मनश्शे आणि एफ्राईम ह्यांनी जिंकलेले प्रदेश
27मनश्शेने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला.
28पुढे इस्राएल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करायला लावले; एकदमच हाकून दिले नाही.
29एफ्राइमाने गेजेर येथे राहणार्‍या कनान्यांना घालवून दिले नाही; ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
इतर वंशांनी जिंकलेले प्रदेश
30जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले.
31अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही;
32म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही.
33नफतालीने बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले.
34अमोर्‍यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले; ते त्यांना तळवटीत उतरू देईनात;
35अमोर्‍यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला; पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोर्‍यांना वेठबिगार करायला लावले.
36अमोर्‍यांची सरहद्द अक्रब्बीमची चढणी आणि सेला येथून वर गेली होती.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy