YouVersion Logo
Search Icon

याकोब 2

2
श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक
1माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका.
2सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला;
3आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;”
4तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही?
5माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?
6पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही?
7जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?
8तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता.
9परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.
10कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.
11कारण “व्यभिचार करू नकोस” असे ज्याने सांगितले, त्यानेच, “खून करू नकोस,” हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस.
12स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा.
13कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.
विश्वास व कृती ह्यांविषयी सूचना
14माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय?
15भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे,
16आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;” पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?
17ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.
18कोणी म्हणेल, “तुझ्या ठायी विश्वास आहे, आणि मला क्रिया आहेत.” क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन.
19एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.
20अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय?
21आपला बाप ‘अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले’ ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय?
22विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते.
23“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.
24तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता.
25तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय?
26म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.

Currently Selected:

याकोब 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy