YouVersion Logo
Search Icon

यशया 9

9
शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द
1तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील.
2अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.
3तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.
4कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.
5युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.
6कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.
7त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
इस्राएलावर परमेश्वराचा कोप
8प्रभूने याकोबाला संदेश पाठवला असून तो इस्राएलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे.
9-10“विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्‍यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्‍या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल.
11परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याच्यावर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूंना उठवील.
12पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.
13तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.
14म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची झावळी व लव्हाळा ही एका दिवसात छेदून टाकील.
15वडील व सन्मान्य पुरुष हा शीर असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट.
16ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.
17ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.
18दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.
19सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.
20ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,
21मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.

Currently Selected:

यशया 9: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy