YouVersion Logo
Search Icon

यशया 2

2
परमेश्वराचे जागतिक शांततेचे राज्य
(मीखा 4:1-3)
1आमोजाचा पुत्र यशया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन :
2शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.
3देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
4तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.
गर्विष्ठांचा परमेश्वराकडून न्याय
5याकोबाच्या घराण्या, चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.
6तुझे लोक, म्हणजे याकोबाचे घराणे, ह्यांचा तू त्याग केला आहेस; कारण ते पूर्वेकडील रीतिभातींत मग्न झाले आहेत, पलिष्ट्यांसारखे मांत्रिक बनले आहेत आणि परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत,
7त्यांचा देश सोन्यारुप्याने भरला आहे; त्यांच्या निधींना अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही.
8त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.
9हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीचावस्था पावला आहे; त्यांना तू क्षमा करूच नकोस.
10परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे.
11त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.
12गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.
13लबानोनाचे मोठे व उंच गेलेले सर्व गंधसरू, बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे;
14सर्व उंच पर्वत, सर्व मोठे डोंगर;
15सर्व उंच बुरूज, सर्व मजबूत तट;
16तार्शीशाची सर्व गलबते व सर्व मनोहर मनोरे ह्यांसाठी दिवस नेमला आहे.
17त्या दिवशी लोकांचा उन्मत्तपणा भंग पावेल. मनुष्यांचा गर्व उतरेल; आणि परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.
18मूर्ती तर अगदी नाहीतशा होतील.
19परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.
20मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.
21परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.
22मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?

Currently Selected:

यशया 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy