YouVersion Logo
Search Icon

निर्गम 40

40
निवासमंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
3त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.
4मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
5साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
7दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर.
8सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव.
9अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल.
10होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यांना अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल.
11गंगाळ व त्याची बैठक ह्यांना अभिषेक करून गंगाळ पवित्र कर.
12अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दाराजवळ नेऊन आंघोळ घाल.
13अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील.
14त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल;
15त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
16मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.
17दुसर्‍या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली.
18मोशेने निवासमंडप उभा केला; त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लावल्या, अडसर लावले व त्याचे खांब उभे केले;
19त्याने निवासमंडपावरून तंबू ताणला व तंबूचे आच्छादन त्यावर घातले; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
20त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले;
21त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
22त्याने निवासमंडपाच्या उत्तर बाजूस दर्शनमंडपात अंतरपटाच्या बाहेर मेज ठेवले;
23आणि त्याच्यावर त्याने परमेश्वरासमोर भाकर व्यवस्थित-पणे मांडली; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
24त्याने निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
25आणि परमेश्वरासमोर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
26त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली;
27तिच्यावर त्याने सुगंधी द्रव्याचा धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28त्याने निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
29आणि दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दाराजवळ होमवेदी ठेवून तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
30दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान त्याने गंगाळ ठेवून धुण्यासाठी त्यात पाणी भरले.
31मोशे आणि अहरोन व त्याचे मुलगे त्यात आपापले हातपाय धूत.
32ते दर्शनमंडपात किंवा वेदीजवळ जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धूत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
33त्याने निवासमंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला.
ह्या प्रकारे मोशेने सर्व काम संपवले. दर्शनमंडपावर असणारा मेघ
(गण. 9:15-23)
34मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना.
36इस्राएल लोकांच्या एकंदर प्रवासात निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत;
37आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
38परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे; हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy