निर्गम 37
37
कोशाची रचना
(निर्ग. 25:10-22)
1मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला. त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात आणि उंची दीड हात होती;
2त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला, पण त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
3त्याच्या चार्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसर्या बाजूला दोन अशा लावल्या.
4त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवले.
5कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घातले.
6त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनवले; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात होती.
7त्याने सोने घडवून दोन करूब बनवले; ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले;
8त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्या टोकासाठी बनवला; करूब व दयासन अखंड असून ते करूब त्याने दोन्ही टोकांना बनवले.
9त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती.
मेजाची रचना
(निर्ग. 25:23-30)
10त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनवले, त्याची लांबी दोन हात व रुंदी एक हात व उंची दीड हात होती;
11त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
12आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली. त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
13त्याच्यासाठी सोन्याच्या चार कड्या ओतून तयार केल्या. त्याच्या चार्ही पायांवरल्या चार कोपर्यांना त्या लावल्या.
14ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या; त्या मेज उचलायच्या दांड्यांसाठी होत्या.
15मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले.
16आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.
दीपवृक्षाची रचना
(निर्ग. 25:31-40)
17त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवला. हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली.
18ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या; एका बाजूला तीन शाखा व दुसर्या बाजूला तीन शाखा;
19प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या. आणि दुसर्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या; दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
20दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या होत्या.
21दीपवृक्षामधून निघणार्या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्याच्या खाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्यांची होती.
22बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला.
23त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
24त्याने तो दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची केली.
धूपवेदीची रचना
(निर्ग. 30:1-5)
25मग त्याने बाभळीच्या लाकडांची धूपवेदी केली; तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस होती. तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती.
26त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चार्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढवली आणि तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
27वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना, दोन कोनांस दोन-दोन अशा लावल्या.
28त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढवले.
अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती
29त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.
Currently Selected:
निर्गम 37: MARVBSI
Highlight
Copy
Compare
Share
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.