निर्गम 25
25
इस्राएल लोकांनी आणायचे दान
(निर्ग. 35:4-9)
1परमेश्वर मोशेला म्हणाला :
2इस्राएल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे; ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे.
3ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारायची त्या ह्या : सोने, चांदी, पितळ;
4निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्यांचे केस;
5लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;
6दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;
7एफोद2 व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने.
8मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.
9निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे.
साक्षीचा कोश
(निर्ग. 37:1-9)
10बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
11तो आतूनबाहेरून शुद्ध सोन्याने मढवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा;
12त्याच्या चार्ही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसर्या बाजूला दोन अशा लावाव्यात.
13आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवावेत.
14तो कोश उचलण्यासाठी हे दांडे त्याच्या दोहो बाजूंच्या कड्यात घालावेत.
15हे दांडे कोशाच्या कड्यातच राहावेत; त्यातून ते काढू नयेत.
16आणि जो साक्षपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा.
17तू शुद्ध सोन्याचे एक दयासन1 बनवावेस; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात असावी;
18आणि सोन्याचे दोन करूब2 दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर; ते घडीव कामाचे असावेत.
19एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्या टोकासाठी बनवावा; हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांना बनवावेत.
20त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावेत की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
21दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा.
22तेथे तुला मी भेटत जाईन; आणि इस्राएल लोकांसाठी ज्या काही गोष्टीसंबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे, त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन.
समक्षतेच्या भाकरींसाठी मेज
(निर्ग. 37:10-16)
23तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनव; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
24ते शुद्ध सोन्याने मढवून त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा,
25आणि त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ करून तिच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
26सोन्याच्या चार कड्या करून त्याच्या चार्ही पायांवरच्या चार कोपर्यांना त्या असाव्यात.
27ह्या कड्या पाळीच्या लगत असाव्यात. मेज उचलण्यासाठी त्यात दांडे घालावेत.
28मेज उचलण्याचे हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून सोन्याने मढवावेत;
29त्यावरची तबके, धूपपात्रे, सुरया आणि पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव; ही शुद्ध सोन्याची बनवावीत.
30आणि मेजावर माझ्यापुढे समक्षतेची भाकर नित्य ठेवावी.
सोन्याचा दीपवृक्ष
(निर्ग. 37:17-24)
31आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास; हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा; त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत;
32आणि ह्या दीपवृक्षाला सहा शाखा असाव्यात; त्याच्या एका बाजूला तीन शाखा व दुसर्या बाजूला तीन शाखा असाव्यात;
33प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह असाव्यात, दुसर्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह असाव्यात; दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच असावी;
34आणि दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलां-सारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या असाव्यात;
35आणि दीपवृक्षामधून निघणार्या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावीत.
36त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत, तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
37आणि त्याच्यासाठी सात दिवे करून दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावेत.
38त्याचे चिमटे आणि त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
39ह्या सर्व उपकरणांसहित हा दीपवृक्ष एक किक्कार3 शुद्ध सोन्याचा करावा.
40पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे ह्या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे.
Currently Selected:
निर्गम 25: MARVBSI
Highlight
Copy
Compare
Share
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.