YouVersion Logo
Search Icon

निर्गम 11

11
प्रथमवत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना
1नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल.
2तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्‍यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.”
3अशा प्रकारे मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता.
4मग मोशे म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन.
5तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्‍या फारोपासून ते जात्यावर बसणार्‍या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील.
6पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.
7तथापि इस्राएल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशूवरही, कुत्रादेखील भुंकणार नाही; ह्यावरून मी परमेश्वर मिसरी लोकांत व इस्राएल लोकांत कसा भेद ठेवतो हे तुम्हांला कळेल.
8तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की, आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोपुढून निघून गेला.
9परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावीत म्हणून फारो तुमचे ऐकणार नाही.”
10मोशे व अहरोन ह्यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि त्याने इस्राएल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in