YouVersion Logo
Search Icon

एस्तेर 2

2
एस्तेर पट्टराणी होते
1ह्यानंतर अहश्वेरोश राजाचा क्रोध शमला, तेव्हा त्याला वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता ह्याचे स्मरण झाले.
2मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा;
3राजाने आपल्या राज्याच्या सर्व प्रांतांत अंमलदार नेमावेत, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन राजवाड्यातील अंतःपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्यात आणि त्यांच्या शुद्धतेसाठी असलेल्या वस्तू त्यांना द्याव्यात.
4मग त्यांपैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वश्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी.” ही गोष्ट राजाला पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले.
5शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता;
6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता.
7त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते; तिला आईबाप नव्हते; ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते.
8राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले.
9ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली.
10एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते.
11एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्‍या घालत असे.
12स्त्रियांसाठी ठरवलेल्या नियमांप्रमाणे बारा महिन्यांपर्यंत सर्वकाही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यांना गंधरसाचे तेल सहा महिने व सुगंधी द्रव्ये सहा महिने लावत असत; शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यांना लावत असत.
13कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई;
14संध्याकाळी ती जात असे; आणि सकाळी ती उपपत्न्यांचा रक्षक राजाचा खोजा शाशगज ह्याच्या देखरेखीखाली दुसर्‍या अंतःपुरात जाई; राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलावल्यावाचून ती पुन्हा त्याच्याकडे जात नसे.
15मर्दखयाचा चुलता अबीहाईल ह्याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची राजाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे ह्याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने-ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली.
16ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली.
17राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.
18मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.
मर्दखय हा राजाविरुद्धचा कट उघडकीस आणतो
19कुमारी दुसर्‍यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.
20अद्याप एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते; मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी, त्याचप्रमाणे तिने ह्या वेळीही त्याची आज्ञा मानली.
21त्या दिवसांत मर्दखय राजद्वारी बसत असे; तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे दोन खोजे बिग्थान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते.
22मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली.
23चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली; तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिले आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy