YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 34

34
मोशेचा मृत्यू
1मग मोशे मवाबाच्या मैदानावरून यरीहोसमोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला, तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, 2नफतालीचा सर्व प्रदेश, एफ्राइमाचा व मनश्शेचा प्रदेश आणि पश्‍चिम समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश,
3आणि नेगेब व सोअरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरीहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले.
4परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानांना देईन, तो देश हाच; तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही.”
5परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मवाब देशीच मरण पावला;
6आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथ-पौरासमोरील एका खोर्‍यात पुरले; परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही.
7मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती.
8इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला; मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले.
9नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले.
10परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही;
11मिसर देशात फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि सबंध देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्या बाबतीत,
12आणि त्याने सर्व इस्राएलासमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम व जो भयंकर दरारा प्रकट केला त्या बाबतीत त्याच्यासमान कोणी झाला नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy