YouVersion Logo
Search Icon

दानीएल 2

2
दानीएल नबुखद्नेस्सराच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो
1नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली.
2तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले.
3राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.”
4ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
5राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत.
6पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हांला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल; ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा.”
7ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
8तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे;
9परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही, तर तुमच्यासंबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हांला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल.”
10खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही.
11महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे; मानवात वास न करणार्‍या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही.”
12हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली.
13ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले.
14राजाच्या गारद्यांचा नायक अर्योक हा बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करण्यास निघाला होता, त्यांच्याबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले.
15त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली.
16मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.”
17ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांना ही हकीगत कळवली.
18आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे.
19मग रात्री दृष्टान्तात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला.
20दानीएल म्हणाला, “देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत;
21तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.
22तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.
23हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”
24ह्यावर दानीएल, ज्या अर्योकास राजाने बाबेलच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमले होते त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, “बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करू नका; मला महाराजांपुढे न्या म्हणजे मी त्यांना स्वप्नांचा अर्थ सांगतो.”
25तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, “महाराजांस स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहूद्यांमध्ये मला आढळला आहे.”
26बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?”
27दानिएलाने राजाला उत्तर दिले की, “महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ ह्यांना महाराजांना सांगता येणार नाही;
28तरी रहस्ये प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार हे नबुखद्नेस्सर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न, आपण बिछान्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टान्त असा आहे :
29महाराज, आपली गोष्ट अशी की, ह्यापुढे काय घडणार हे विचार आपण बिछान्यावर पडला असता आपल्या मनात आले आणि ह्यापुढे काय होणार हे, रहस्ये प्रकट करणार्‍या देवाने आपणांला कळवले आहे.
30आता माझी गोष्ट अशी आहे की, हे रहस्य मला प्रकट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नांचा अर्थ प्रकट व्हावा व आपणांला आपल्या मनातील विचार समजावेत म्हणून झाले आहे.
31महाराज, आपण दृष्टान्त पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजःपुंज असा आपणापुढे उभा होता; त्याचे रूप विक्राळ होते.
32त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व हात रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या,
33त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता.
34आपण स्वप्न पाहत असता, कोणाचा हात न लागता, एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे फुटून तुकडे-तुकडे झाले.
35तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
36हेच आपले स्वप्न; आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो.
37महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;
38आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे; सुवर्णाचे शीर आपणच आहात.
39आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल; आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल; ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवील.
40चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल; लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणार्‍या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील.
41आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली; त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता; तसे हे राज्य द्विविध होईल; तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबुती राहील.
42त्या पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता; तसे ते राज्य अंशत: बळकट व अंशतः भंगुर असे होईल.
43लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील; पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत.
44त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.
45आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण केले; त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.”
46तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने पालथे पडून दानिएलास साष्टांग नमस्कार घातला आणि ‘त्याच्यापुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा’ अशी आज्ञा केली.
47राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”
48मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले.
49राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला; पण दानीएल राजदरबारी असे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy