YouVersion Logo
Search Icon

कलस्सै 2

2
1कारण तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.
2ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे; ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी; व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.
3त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत.
ख्रिस्ताशी संयुक्त होणे
4लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे,
5तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.
6तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा;
7त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.
खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा
8ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या;
9कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते,
10आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात.
11त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव1 झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली.
12तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलात, आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात.
13जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;
14आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.
15त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
16तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.
17ह्या बाबी पुढे होणार्‍या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे.
18लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.
19असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.
20तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता?
21,22म्हणजे “हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको,” अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणार्‍या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता?
23ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यांवरून ज्ञान म्हणतात खरे; तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy