YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 2

2
पवित्र आत्म्याचे दान
1नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते.
2तेव्हा अकस्मात मोठ्या वार्‍याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.
3आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या.
4तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
5त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते.
6तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले.
7ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?
8तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
9पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,
10फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमी प्रवासी,
11क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
12तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?”
13परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
पेन्टेकॉस्टच्या वेळचे पेत्राचे भाषण
14तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
15तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;
16परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे :
17‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की,
मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील,
तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील,
व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील;
18आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व
आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा
वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील;
19‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली
‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप
वाफ अशी मी दाखवीन;
20परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी
सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;
21तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या
नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’
22अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे.
23तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले.
24त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
25दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो,
‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे;
मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;
26म्हणून माझे हृदय आनंदित
व माझी जीभ उल्लसित झाली;
आणि माझा देहही आशेवर राहील.
27कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस.
28जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत;
तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’
29बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.
30तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव ‘शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानांतील एकाला (म्हणजे ख्रिस्ताला) तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवीन.’
31ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना-विषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही.’
32त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
33म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
34कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो,
‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
35मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’
36म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”
37हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”
38पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
39कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”
40आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”
41तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
ख्रिस्ती मंडळीचे दैनंदिन जीवन
42ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.
43तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती.
44तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते.
45ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत.
46ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.
47सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy