YouVersion Logo
Search Icon

२ शमुवेल 2

2
दावीद यहूदा राष्ट्राचा राजा होतो
1ह्यानंतर दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न विचारला की, “मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” परमेश्वराने म्हटले, “जा.” दाविदाने विचारले, “कोणीकडे जाऊ?” त्याने म्हटले, “हेब्रोनास जा.”
2मग दावीद इज्रेलीण अहीनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्या आपल्या दोन्ही स्त्रियांसह तेथे गेला.
3तसेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांना आपापल्या कुटुंबांसह त्याने बरोबर नेले, व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले.
4यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.”
5तेव्हा दाविदाने याबेश-गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यांना सांगितले की, “तुम्ही आपला स्वामी शौल ह्याला मूठमाती दिली ही तुम्ही त्याच्यावर दया केली, ह्याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो.
6आता परमेश्वर तुमच्याशी दयेने व सत्यतेने वर्तो; तुम्ही हे कृत्य केले आहे ह्या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हांला देईन.
7हिंमत धरा, शूर व्हा; तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहूदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमले आहे.” दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो 8इकडे नेराचा पुत्र अबनेर जो शौलाचा सेनापती होता तो शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याला बरोबर घेऊन नदीपलीकडे महनाईम येथे गेला.
9आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.
10शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलावर राज्य करू लागला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता; त्याने दोन वर्षे राज्य केले, पण यहूदाचे घराणे दाविदाला धरून राहिले.
11हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती.
12मग नेराचा पुत्र अबनेर आणि शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्यांचे सेवक महनाइमाहून गिबोन येथे गेले.
13इकडे सरूवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावाजवळ गाठ पडली; तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसर्‍या बाजूला उतरले.
14तेव्हा अबनेर यवाबाला म्हणाला, “तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे दोन हात खेळावेत.” यबावाने म्हटले, “बरे, त्यांनी उठावे.”
15शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे बारा तरुण बन्यामिनी आणि दाविदाच्या लोकांतले बारा असे संख्येने सारखे पुरुष उठून पुढे सरसावले.
16तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तलवारी आपल्याबरोबर झुंजणार्‍यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले; ह्यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथहसूरीम (तीक्ष्ण धारेच्या सुर्‍यांचे क्षेत्र) असे पडले; हे गिबोनात आहे.
17त्या दिवशी तुंबळ युद्ध झाले. दाविदाच्या सेवकांपुढे अबनेर व इस्राएल लोक ह्यांनी हार खाल्ली.
18सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.
19असाएलाने अबनेराचा पाठलाग केला; तो त्याच्या पाठीमागे लागला असता उजवीडावीकडे वळला नाही.
20अबनेराने मागे वळून त्याच्याकडे पाहिले व विचारले, “तू असाएल काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी.”
21अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळून एखाद्या तरुणाला पकडून त्याचे कवच लुटून घे;” पण असाएल त्याचा पाठलाग करायचा सोडीना.
22अबनेर पुन्हा असाएलाला म्हणाला, “माझा पाठलाग करण्याचे सोडून दे; तुला मारून मी जमिनीवर का पाडावे? मग तुझा भाऊ यवाब ह्याला मी आपले तोंड कसे दाखवू?”
23तरी तो काही केल्या मागे सरेना; तेव्हा अबनेराने आपल्या भाल्याचा दांडा त्याच्या पोटात असा खुपसला की तो त्याच्या पोटात जाऊन पाठीतून निघाला; आणि तो तेथेच पडून मेला. असाएल मरून पडला त्या ठिकाणी जेवढे लोक आले तेवढे स्तब्ध उभे राहिले.
24इकडे यवाब व अबीशय ह्यांनी अबनेराचा पाठलाग चालू ठेवला, व सूर्यास्त होता होता अम्मा नामक पहाडाजवळ ते पोहचले; हा पहाड गिबोन रानाच्या वाटेवरील गिहा नावाच्या गावासमोर आहे.
25बन्यामिनी लोक अबनेरामागे एकवट होऊन एक फौज बनवून एका पहाडाच्या शिखरावर उभे राहिले.
26तेव्हा अबनेर यवाबाला हाक मारून म्हणाला, “तलवारीला निरंतर भक्ष्य देत राहायचे काय? ह्याचा अंती परिणाम दुःखदायक होणार हे तुला ठाऊक नाही काय? आपल्या भाऊबंदांच्या पाठीमागे लागण्याचे सोडून द्या, अशी आज्ञा तू आपल्या लोकांना कोठवर करणार नाहीस?”
27यवाब म्हणाला, “देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीमागे लागले नसते.”
28मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्राएलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही.
29अबनेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देनेपलीकडे गेले, आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाइमाला पोहचले.
30अबनेराचा पाठलाग करण्याचे सोडून परत आल्यावर यवाबाने सर्व लोक जमा केले; तेव्हा दाविदाच्या लोकांपैकी एकोणीस पुरुष व असाएल हे नाहीत असे त्याला आढळून आले.
31तेव्हा दाविदाच्या लोकांनी बन्यामिनी व अबनेराचे लोक ह्यांना असा मार दिला की त्यांतले तीनशेसाठ पुरुष गतप्राण झाले;
32आणि त्यांनी असाएलाला उचलून नेऊन बेथलेहेमा-तील त्याच्या पित्याच्या थडग्यात मूठमाती दिली. मग यवाब व त्याचे लोक रात्रभर कूच करून उजाडताच हेब्रोनास पोहचले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy