२ इतिहास 5
5
1ह्या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद ह्याने समर्पित केलेले सोने, चांदी व सर्व पात्रे शलमोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
शलमोन मंदिरात कोश आणतो
(१ राजे 8:1-11)
2मग शलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व मुख्य, आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे सरदार ह्यांना यरुशलेमेत जमा केले.
3सर्व इस्राएल पुरुष सातव्या महिन्यातल्या सणात राजाजवळ जमा झाले.
4इस्राएलाचे सर्व वडील जन आले तेव्हा लेव्यांनी कोश उचलून घेतला.
5कोश, दर्शनमंडप व मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही लेवीय याजकांनी वरती वाहून नेली.
6शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे इतके बली अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा मोजता आली नाही.
7मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभार्यात परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या नेमलेल्या ठिकाणी नेऊन ठेवला.
8कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते.
9त्यांचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके कोशातून बाहेर आलेली गाभार्यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत; तो कोश आजपर्यंत तेथेच आहे.
10इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन पाट्या ठेवल्या होत्या; त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.
11याजक पवित्रस्थानातून बाहेर आले; जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणांस पवित्र केले होते; त्यांनी ह्या वेळी पाळ्यांचा क्रम सोडला होता.
12जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान व यदूथून, तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेऊन झांजा, सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्यांच्याबरोबर एकशे वीस याजक कर्णे वाजवत होते.
13कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
14त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.
Currently Selected:
२ इतिहास 5: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.