YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 1

1
नमस्कार व उपकारस्तुती
1करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्‍या सर्वांना,
2देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :
3देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
4ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो;
5,6तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात;
7असे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.
8आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील.
9ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती
10बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.
11कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे.
12माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.
13ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?
14क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.
15न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा!
16(आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्‍या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.)
17कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.
वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य
18कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.
19“कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन,
व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
20‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?
21कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.
22कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात,
23आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,
24परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.
25कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
26तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत;
27तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;
28आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे,
29म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये.
30त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;
31ह्यासाठी की, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy