YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 29

29
1नंतर दावीद राजाने सर्व मंडळीला म्हटले, “माझा पुत्र शलमोन सुकुमार बालक आहे, ह्यालाच देवाने निवडले आहे आणि काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.
2माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्‍हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.
3ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो.
4मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार1 ओफीरचे सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे मी देतो;
5सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवायच्या सर्व कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे?”
6तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्राएलांच्या वंशांचे सरदार, सहस्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी ह्यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या;
7देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी पाच हजार किक्कार सोने व दहा हजार दारिक2 सोने, दहा हजार किक्कार चांदी, अठरा हजार किक्कार पितळ, एक लाख किक्कार लोखंड त्यांनी दिले.
8त्यांच्याजवळ रत्ने होती ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारासाठी देण्यास गेर्षोनी यहीएल ह्याच्या हवाली केली.
9तेव्हा लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खर्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पण केली होती; दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. दावीद परमेश्वराचा धन्यवाद करतो 10दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस.
11हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस.
12धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे.
13तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो.
14आम्हांला ह्या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावीत असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्वकाही तुझ्यापासूनच प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत.
15आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही.
16हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे हा तुझ्याच हातून आम्हांला मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे.
17माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.
18हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर.
19माझा पुत्र शलमोन ह्याला असे सात्त्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्वकाही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.”
दाविदानंतर शलमोन गादीवर येतो
(१ राजे 2:10-12)
20मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले.
21दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पण केले; त्यांनी एक हजार बैल, एक हजार एडके व एक हजार कोकरे पेयार्पणांसहित अर्पून सर्व इस्राएलासाठी विपुल यज्ञ केले;
22त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलमोन ह्याला दुसर्‍यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला.
23मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला; सर्व इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत असत.
24सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले.
25परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.
26ह्या प्रकारे इशायाचा पुत्र दावीद ह्याने सर्व इस्राएलावर राज्य केले.
27त्याने चाळीस वर्षे इस्राएलावर राज्य केले; हेब्रोनात सात वर्षे व यरुशलेमेत तेहेतीस वर्षे.
28आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला.
29दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे.
30त्याची सर्व कारकीर्द, त्याचा पराक्रम, त्याच्यावर व इस्राएलावर व देशोदेशींच्या राज्यांवर काय-काय प्रसंग गुदरले हेही त्यांत लिहिले आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy