मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले.