YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 22

22
पूर्वेकडील गोत्रे घरी परततात
1नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले 2आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे. 3कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे. 4आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा. 5परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”
6तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले. 7(मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला, 8“तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.”
9तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.
10जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली. 11आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, 12तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.
13म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले. 14त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.
15जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले: 16“याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता? 17पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही. 18आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय?
“ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल. 19जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका. 20जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”
21तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले: 22“याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका. 23जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो.
24“नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे? 25आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.
26“म्हणूनच आम्ही म्हणालो, ‘चला आपण तयार होऊन वेदी बांधू या, परंतु होमार्पणासाठी किंवा यज्ञासाठी नाही.’ 27तर ती आमच्या आणि तुमच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये साक्ष असावी, यासाठी की आम्ही होमार्पण, यज्ञे व शांत्यर्पणे करून याहवेहच्या पवित्रस्थानी सेवा करावी, म्हणजे ‘याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही’ असे भविष्यात तुमचे वंशज आमच्या वंशजांना म्हणू शकणार नाहीत.
28“आणि आम्ही म्हणालो, ‘जर ते आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तर आम्ही उत्तर देऊ: आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या याहवेहच्या वेदीचा हा नमुना पाहा, होमार्पणे किंवा यज्ञांसाठी नाही, परंतु आमच्या आणि तुमच्यामध्ये ही साक्ष म्हणून असावी.’
29“याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.”
30जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले. 31मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”
32मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला. 33तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.
34रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले.

Currently Selected:

यहोशुआ 22: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in