YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 20

20
आश्रयाची शहरे
1तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले: 2“इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत. 3यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्‍यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे. 4जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी. 5जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्‍याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती. 6जोपर्यंत तो सभेसमोर खटल्यासाठी उभा राहत नाही आणि त्यावेळेस तिथे सेवा करीत असलेला महायाजकास मृत्यू येईपर्यंत त्याने त्या शहरात राहावे. त्यानंतर तो व्यक्ती जिथून पळून आला, त्या नगरात स्वतःच्या घरी परत जावे.”
7तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली. 8यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली. 9त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्‍याकडून तो मारला जाऊ नये.

Currently Selected:

यहोशुआ 20: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in