YouVersion Logo
Search Icon

शास्ते 19

19
एक लेवी आणि त्याची उपपत्नी
1त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता.
लेवी वंशातील कोण एक मनुष्य एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या भागात राहत होता. त्याने यहूदीयातील बेथलेहेम मधील एक स्त्री आपली उपपत्नी करून घेतली. 2परंतु ती उपपत्नी त्याच्यासोबत विश्वासू राहिली नाही. तिने त्याला सोडले आणि यहूदीयातील बेथलेहेमातील आपल्या पित्याच्या घरी परतली. तिथे चार महिने राहिल्यानंतर, 3तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले. 4त्याच्या सासर्‍याने म्हणजे स्त्रीच्या पित्याने त्याला थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला; आणि म्हणून तो त्याच्यासोबत खातपीत आणि विश्राम करीत तिथे तीन दिवस राहिला.
5चौथ्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्या मनुष्याने निघण्याची तयारी केली, परंतु स्त्रीच्या पित्याने आपल्या जावयाला म्हटले, “काहीतरी खाऊन तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा; नंतर तुम्ही जाऊ शकता.” 6मग ते दोघे सोबत खाली बसून एकत्र खाणेपिणे केले. त्यानंतर स्त्रीचा पिता म्हणाला, “कृपया आजची रात्र थांबा आणि आनंद करा.” 7आणि जेव्हा तो पुरुष जाण्यास उठला तेव्हा त्याच्या सासर्‍याने त्याला आग्रह केला, म्हणून त्या रात्री तो तिथे राहिला. 8पाचव्या दिवसाच्या सकाळी, जेव्हा तो जाण्यास उठला, स्त्रीच्या पित्याने म्हटले, “तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा. मग दुपारपर्यंत थांबा!” मग ते दोघे एकत्र जेवले.
9मग जेव्हा तो पुरुष, त्याची उपपत्नी आणि त्याचा सेवक जाण्यास उठले, तेव्हा त्याचा सासरा, त्या स्त्रीचा पिता म्हणाला, “पाहा, आता तर संध्याकाळ झालीच आहे. रात्र इथेच घालवा. दिवस संपत आला आहे. थांबा आणि आनंद करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरासाठी मार्गस्थ व्हा.” 10परंतु आणखी एक रात्र थांबण्यास तयार झाला नाही, तो पुरुष निघाला आणि आपली उपपत्नी व त्याचे खोगीर घातलेले दोन गाढव घेऊन यबूस (म्हणजे यरुशलेम आहे) येथे निघाले.
11जेव्हा ते यबूस जवळ होते आणि दिवस उतरला होता, तेव्हा तो सेवक आपल्या धन्यास म्हणाला, “चला आपण या यबूसी लोकांच्या शहरात थांबू आणि रात्र घालवू.”
12त्याच्या धनी म्हणाला, “नाही, आपण अशा कोणत्याही शहरात जाणार नाही जे इस्राएली लोक नाहीत. आपण गिबियाहपर्यंत जाऊ.” 13तो आणखी म्हणाला, “चला आपण गिबियाह किंवा रामाहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि यापैकी एका ठिकाणी मुक्काम करू.” 14तेव्हा ते प्रवास करीत पुढे निघाले आणि सूर्य मावळत असता ते बिन्यामीनच्या गिबियाहजवळ पोहोचले. 15तिथे रात्र घालविण्यासाठी ते गिबियाहात थांबले. ते शहराच्या चौकात बसले, परंतु कोणीही त्यांना आपल्या घरी घेतले नाही.
16त्या संध्याकाळी एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून येत होता. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह (बिन्यामीन लोक तिथे राहत होते) येथे राहत होता. 17त्याने शहराच्या चौकात तळ दिलेल्या प्रवाशांना पाहिले, आणि विचारले, “तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही कुठून आला?”
18त्याने उत्तर दिले. “यहूदीयातील बेथलेहेमातून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या ठिकाणी जिथे मी राहतो तिथे जात आहोत. मी यहूदीयातील बेथलेहेम नगरात गेलो होतो आणि आता मी याहवेहच्या भवनात#19:18 काही मूळ प्रतींनुसार घरी जात आहे. परंतु कोणीही मला रात्रीसाठी आपल्या घरात घेतलेले नाही. 19आमच्याजवळ आमच्या गाढवांसाठी दाणा आणि वैरण आहे आणि आमच्या सेवकांसाठी भाकरी आणि द्राक्षारस भरपूर आहे—मी, तुमची सेविका आणि आमच्यासोबतचा तरुण. आम्हाला कशाचीही उणीव नाही.”
20“तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.” 21तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घरी नेले. ते विश्रांती घेत असताना आणि त्यांच्या गाढवांना वैरण दिली. त्यांनी आपले पाय धुतले, त्यांनी काही खाणेपिणे केले.
22ते आनंदात असताना, गावातील काही अधम लोकांचे टोळके घराभोवती जमा झाले आणि दार जोरजोराने ठोकून त्या म्हातार्‍या मनुष्यास जो घराचा स्वामी आहे त्यास ओरडून म्हणू लागले, “जो पुरुष तुझ्या घरी आला आहे त्यास बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर शारीरिक संबंध करू.”
23तेव्हा घराचा स्वामी बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “नाही, माझ्या बंधुजनांनो, असले नीच कृत्य करू नका, कारण तो पुरुष माझा पाहुणा आहे, तुम्ही हे घृणास्पद कृत्य करू नका. 24पाहा, इथे माझी कुमारी कन्या आणि त्याची उपपत्नी आहे. मी त्या दोघींना तुमच्याकडे बाहेर आणतो आणि त्यांच्याशी तुम्हाला वाटेल ते करा, परंतु त्या पुरुषाशी असले घृणास्पद कृत्य करू नका.”
25परंतु ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या पुरुषाने आपल्या उपपत्नीला घेतले आणि तिला त्यांच्याकडे बाहेर पाठविले, आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिच्याशी कुकर्म केले व पहाटेस त्यांनी तिला जाऊ दिले. 26पहाटेस ती स्त्री आपला स्वामी राहत असलेल्या घरी परतली आणि घराच्या दाराशी खाली पडली आणि उजाडेपर्यंत ती तशीच पडून राहिली.
27सकाळी जेव्हा तिचा स्वामी उठला व घराचे दार उघडले आणि आपल्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर आला, तेव्हा त्याने त्याच्या उपपत्नीला घराच्या दारासमोर खाली पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले. 28तो तिला म्हणाला, “चल ऊठ, आपण निघू या.” परंतु काहीही उत्तर आले नाही. नंतर त्या मनुष्याने तिला गाढवाच्या पाठीवर घातले व तो आपल्या घरी गेला.
29जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याने एक सुरी घेतली आणि त्याच्या उपपत्नीचे एकएक भाग कापून बारा भाग केले आणि इस्राएलांच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले. 30ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी एक दुसर्‍यांना म्हटले, “इस्राएली लोक इजिप्तमधून आले, तेव्हापासून आजवर अशी घटना पाहिली नाही किंवा केली नाही. आपण काहीतरी केलेच पाहिजे! चला बोलू या!”

Currently Selected:

शास्ते 19: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in