YouVersion Logo
Search Icon

शास्ते 16

16
शमशोन आणि दलीला
1एके दिवशी शमशोन गाझा येथे गेला, जिथे त्याने एका वेश्येला पाहिले. तिच्यासोबत रात्र घालविण्यास तो आत गेला. 2गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.”
3परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली.
4काही काळानंतर सोरेक खोर्‍यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. 5पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल#16:5 अंदाजे 13 कि.ग्रॅ. देऊ.”
6दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.”
7शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्‍यांनी बांधले, तर मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.”
8तेव्हा पलिष्टी अधिकार्‍यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्‍या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले. 9काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्‍या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही.
10त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.”
11तो म्हणाला, “ज्यांचा कधीही वापर केला नाही अशा अगदी नव्या कोर्‍या दोरांनी जर मला कोणी बांधून टाकले, तर मी इतर मनुष्यासारखा बलहीन होईन.”
12तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले!
13तेव्हा दलीलाने शमशोनास म्हटले, “आतापर्यंत तुम्ही मला मूर्ख बनविले आणि आणि मला खोटे सांगितले. मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.”
तो तिला म्हणाला, “पाहा, माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि त्या फणीने घट्ट केल्या तर मी इतर माणसांसारखा बलहीन होईन.” मग तो झोपला असताना, दलीलाने त्याच्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या 14आणि ते फणीने घट्ट केल्या.
परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
15नंतर ती त्याला म्हणाली, “जेव्हा तुमचे हृदय माझ्यावर नाही, तेव्हा तुम्हाला कसे म्हणता येईल, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो?’ ही तिसरी वेळ आहे जेव्हा तुम्ही मला मूर्ख बनविले आहे आणि तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य सांगितले नाही.” 16दररोज बोलून बोलून तिने त्याला भांडावून सोडले; त्याला जीव नकोसा झाला.
17म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.”
18जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने तिला सर्वकाही सांगितले आहे, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप पाठविला, “एकदा अजून या; त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांच्या हातात चांदी घेऊन परत आले. 19त्याला आपल्या मांडीवर झोपविल्यानंतर, तिने कोणाला तरी बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करून घेतले आणि तिने त्याला वश#16:19 किंवा त्याला अशक्त वाटू लागले करण्यास प्रारंभ केला आणि त्याचे सामर्थ्य त्याला सोडून गेले.
20मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!”
तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही.
21तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर ते त्याला खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले. 22परंतु त्याच्या डोक्यावरील केस मुंडण झाल्यानंतर पुन्हा वाढू लागले.
शमशोनचा मृत्यू
23आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोन याला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”
24जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले,
“आमच्या दैवताने आमच्या शत्रूला
आमच्या हाती दिले आहे,
जो आमच्या देशाची गांजणूक करणारा
व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.”
25जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली.
जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले, 26तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.” 27आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते. 28मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या डोळ्यांबद्दल त्याचा सूड घेऊ शकेन. 29मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्‍या बाजूला डाव्या हाताने धरले, 30शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले, आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोक यांच्यावर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती.
31नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

Currently Selected:

शास्ते 16: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in