YouVersion Logo
Search Icon

इब्री 9

9
पृथ्वीवरील मंदिरातील उपासना
1पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. 2एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत. 3दुसर्‍या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत. 4त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. 5आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.
6या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत, 7पण आतील खोलीत फक्त महायाजकच प्रवेश करीत असे आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अजाणतेने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही. 8या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता. 9हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही. 10हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.
ख्रिस्ताचे रक्त
11परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत#9:11 काही मूळ प्रतींनुसार ज्या पुढे घडणार आहेत त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले. 12त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली. 13जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते. 14तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल!
15याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.
16कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे. 17मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही. 18या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही. 19जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले. 20मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”#9:20 निर्ग 24:8 21आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले. 22खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.
23मग हे आवश्यक होते की, स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे होते, परंतु स्वर्गीय गोष्टी याहून चांगल्या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे अगत्य होते. 24ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्‍या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे. 25आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते. 26तसे करणे आवश्यक असते, तर त्यांना जगाच्या स्थापनेपासून अनेकदा दुःख सहन करावे लागले असते. पण आता ते एकदाच युगाच्या समाप्तीस स्वयज्ञ करून प्रकट झाले आणि त्यांनी पापाची सत्ता नष्ट केली. 27जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे, 28तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्‍या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील.

Currently Selected:

इब्री 9: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in