YouVersion Logo
Search Icon

इब्री 2

2
लक्ष देण्याबाबत इशारा
1आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये. 2कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली. 3ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू? 4परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत.
येशू परिपूर्ण मानव
5ज्या येणार्‍या जगाबद्दल आपण बोलत आहोत, ते जग देवदूतांच्या हाती सोपवून दिलेले नाही. 6परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे:
“मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी,
आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी?
7तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे.
गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्याच्या डोक्यावर ठेवला आहे,
8आणि सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहे.”#2:8 स्तोत्र 8:4‑6
सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या असताना, परमेश्वराने कोणतीच अशी गोष्ट ठेवली नाही की जी त्यांच्या स्वाधीन केली नाही. तरी सध्या हे सर्व स्वाधीन केल्याचे आपण अद्यापि पाहिले नाही. 9पण फक्त काही काळ देवदूतांहून किंचित कमी असे केले होते, या येशूंना आता गौरवाने व सन्मानाने मुकुटमंडित केले आहे असे आपण पाहतो, कारण त्यांनी मरण सोसले, यासाठी की परमेश्वराच्या कृपेद्वारे त्यांनी प्रत्येकासाठी मरणाचा अनुभव घ्यावा.
10हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे. 11जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही. 12ते म्हणतात,
“मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन;
मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”#2:12 स्तोत्र 22:22
13आणि पुन्हा,
“मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.”
आणि आणखी ते म्हणाले,
“पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”#2:13 यश 8:17, 18
14आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे. 15मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्‍यांची त्यांना सुटका करता येईल. 16हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात. 17या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधूसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले. 18कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.

Currently Selected:

इब्री 2: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in