YouVersion Logo
Search Icon

1 शमुवेल 8

8
इस्राएली लोक राजा मागतात
1जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी#8:1 मुळात न्यायाधीश म्हणून नेमले. 2त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्‍याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली. 3परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत.
4म्हणून इस्राएलचे सर्व पुढारी एकत्र झाले आणि रामाह येथे शमुवेलकडे आले. 5ते शमुवेलला म्हणाले, “तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत; तर आता जसे इतर राष्ट्रांना आहे त्याप्रमाणे आमचेही नेतृत्व करण्यासाठी एक राजा नेमून द्यावा.”
6परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली. 7तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे. 8मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत. 9आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.”
10शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते. 11शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील. 12त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील. 13तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्‍या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल. 14तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल. 15तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल. 16तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू#8:16 किंवा तरुण पुरुष व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल. 17तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल. 18जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.”
19परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच. 20म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.”
21लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्यांनी याहवेहला सांगितले. 22याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.”
नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.”

Currently Selected:

1 शमुवेल 8: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in