YouVersion Logo
Search Icon

1 शमुवेल 4

4
1आणि शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलात पोहोचला.
कराराच्या कोशावर पलिष्टी लोकांचा ताबा
यावेळेस इस्राएली लोक पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी निघाले. इस्राएली लोकांनी एबेन-एजर येथे व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. 2पलिष्ट्यांनी इस्राएलशी युद्ध करण्यासाठी त्यांचे सैन्य तैनात केले आणि जसे युद्ध वाढत गेले तसा पलिष्ट्यांद्वारे इस्राएलचा पराभव झाला, त्यांच्यापैकी सुमारे चार हजार लोकांना युद्धभूमीवर मारले गेले. 3जेव्हा सैनिक छावणीकडे परत आले तेव्हा इस्राएलच्या वडीलजनांनी विचारले, “याहवेहने आज पलिष्ट्यांसमोर आमचा पराभव का होऊ दिला? आपण शिलोह येथून याहवेहच्या कराराचा कोश घेऊन येऊ, यासाठी की ते आपल्याबरोबर जाऊन आपल्या शत्रूच्या हातातून आपल्याला वाचवतील.”
4म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
5जेव्हा याहवेहच्या कराराचा कोश छावणीमध्ये आला, तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी इतका मोठा जयघोष केला की, जमीन हादरली. 6तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?”
जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे, 7तेव्हा पलिष्टी लोक घाबरून गेले. “देव छावणीत आले आहेत,” ते म्हणाले, “अरेरे! असे अद्याप कधीच घडले नव्हते. 8आम्हास हाय हाय! या शक्तिमान देवाच्या हातून आम्हास कोण सोडवेल? ते तेच देव आहेत ज्यांनी रानात इजिप्तच्या लोकांवर प्रत्येक प्रकारच्या पीडा आणून त्यांचा नाश केला. 9पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!”
10तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले. 11परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.
एलीचा मृत्यू
12त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला. 13जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला.
14एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?”
तो मनुष्य घाईने एलीकडे गेला, 15एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते. 16त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.”
एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”
17ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”
18जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले#4:18 म्हणजे न्याय होते.
19त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली. 20तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.
21त्या मुलाचे नाव ईखाबोद#4:21 ईखाबोद अर्थात् वैभव नाहीसे झाले असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. 22ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

Currently Selected:

1 शमुवेल 4: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in