YouVersion Logo
Search Icon

1 करिंथकरांस 9

9
प्रेषित म्हणून पौलाचे हक्क
1मी स्वतंत्र नाही का? मी प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूंना पाहिले नाही का? प्रभूमध्ये तुम्ही माझ्या श्रमाचे फळ नाही का? 2कदाचित मी दुसर्‍यांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी नक्कीच आहे! कारण माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही प्रभूमध्ये शिक्का आहात.
3माझा न्याय करणार्‍यांना हे माझे बचावाचे उत्तर आहे. 4आम्हाला खाण्याचा पिण्याचा अधिकार नाही काय? 5इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? 6फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?
7स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का? 8मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही? 9कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.”#9:9 अनु 25:4 आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय? 10हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी. 11जर आम्ही तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीचे बीज पेरले आणि त्याबद्दल केवळ भौतिक गोष्टींच्या हंगामाची अपेक्षा केली, तर त्यात काय मोठे झाले? 12जर इतरांना तुमच्याकडून या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे, तर आम्हालाही तुमच्याकडून मिळण्याचा अधिक हक्क नाही काय?
परंतु आम्ही त्या अधिकाराचा उपयोग केला नाही. याउलट, ख्रिस्ताच्या शुभवार्तेमध्ये अडखळण येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी सहन करण्यास तयार आहोत.
13जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय? 14याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.
15परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन. 16कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो. 17मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. 18माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.
पौलाच्या स्वातंत्र्याचा उपयोग
19मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे. 20यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्‍यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही. 21ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे. 22जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे 23मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्‍या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे.
आत्मशिस्तीची आवश्यकता
24शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. 25जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो. 26म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही. 27मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in