YouVersion Logo
Search Icon

रोम. 15

15
सशक्त व अशक्त
1म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये. 2आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. 3कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले. 4कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्‍या उत्तेजनाने आशा धरावी. 5आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे; 6म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे.
परराष्ट्रीय
7म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. 8कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे, 9आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की,
‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन,
आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
10आणि पुन्हा तो म्हणतो की,
‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’ 11आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’
12आणि पुन्हा, यशया म्हणतो की,
‘इशायाला अंकुर फुटेल,
आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील;
त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’
13आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
पौलाने प्रशस्तपणे लिहीण्याचे कारण
14आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहात. 15पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून, तुम्हास काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे. 16ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे. 17म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. 18कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही. 19चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने; अशाप्रकारे मी यरूशलेम शहरापासून सभोवताली इल्लूरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. 20पण दुसर्‍याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो. 21म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे,
‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील,
आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’
पौलाचे पुढील बेत
22आणि म्हणून, तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला. 23पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे, 24मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे. 25पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. 26कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. 27हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 28म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. 29आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन.
प्रार्थना करण्याची विनंती
30पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा; 31म्हणजे, यहूदीयात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरूशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी; 32म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे. 33आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Currently Selected:

रोम. 15: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in