YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 33

33
उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती
1न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा,
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या;
दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
3त्याच्यासाठी नवे गीत गा;
मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
4कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे,
आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
5देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे,
परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
6परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली
आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
7तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो,
तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
8सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो,
जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
9कारण तो बोलला आणि ते झाले,
त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
10राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो,
तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
11परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात,
त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
12परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे.
ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
13परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो,
तो सर्व लोकांस पाहातो.
14तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून
पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
15ज्याने सर्वांची हृदये घडवली तो
त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
16पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही.
वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
17घोडा विजयासाठी व्यर्थ आहे.
त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
18पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे.
जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
19त्यांना मरणापासून,
आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
20आम्ही परमेश्वराची वाट पाहू,
तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
21त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते,
कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
22परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे
त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in