YouVersion Logo
Search Icon

नीति. 8

8
ज्ञानाची थोरवी
1ज्ञान हाक मारित नाही काय?
सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
2रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर,
ज्ञान तिला चौकाकडे उभे करते.
3ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ,
शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते.
4“लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे.
आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते.
5अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या
आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा.
6ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे,
आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन,
7कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते,
आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे.
8माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत;
त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.
9ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत;
ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत.
10रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा,
आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.
11कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे;
त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही.
12मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते,
आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे.
13परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे;
मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग
व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
14चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत;
मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत.
15माझ्याद्वारे राजे
सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात.
16माझ्याद्वारे राजपुत्र
आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात.
17माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते;
आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते.
18धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे.
19माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे;
मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे.
20जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते,
ती वाट न्यायाकडे नेते,
21म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत#धनसंपत्ती देते.
आणि त्यांची भांडारे भरते.
22परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले
पहिले कृत्य असे मला निर्माण केले.
23अनादिकाली, प्रारंभापासून
पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
24जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते.
तेव्हा माझा जन्म झाला;
25पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी,
आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला.
26परमेश्वराने पृथ्वी व शेत
किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
27जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते,
जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.
28जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि,
जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले.
29जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते.
पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये,
आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.
30तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते,
दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो,
मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.
31मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी,
आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता.
32तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका,
जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.
33माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा;
दुर्लक्ष करू नका.
34जो माझे ऐकतो तो सुखी होईल
तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो;
तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो.
35कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते,
आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो.
36पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो;
जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”

Currently Selected:

नीति. 8: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in